1 लाख 1 टक्के महाजन आणि फडणवीस यांना संपवायचे आहे; फडणवीसांच्या दाव्याने विधानसभा हादरली

मुंबई : राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकारचं रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

प्रत्येक व्हिडीओत कुणाचा काय काय संवाद आहे याची सविस्तर माहिती दिली. या व्हिडीओत कोण कोण संवाद साधत आहे हेही त्यांनी सांगितलं. तसेच सरकारी वकिलाने कट कसा प्लांट करायचा, पुरावे कसे तयार करायचे, जबानी कशी नोंदवायची, साक्षीदाराने साक्ष काय द्यायची याची तयारी केल्याचंही फडणवीस यांनी विस्तृतपणे सभागृहात मांडले.

सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले. या व्हिडीओच्या 20 ते 25 वेब सीरीज होतील असाही टोला त्यांनी लगावला. या स्टिंग ॲापरेशन मधून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचं सभागृहात अक्षरशः वस्रहरण केलं आहे. आता या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून CBI चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, एका व्हिडीओमध्ये साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. पण,  साहेबांना यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना. 1 लाख 1 टक्के. गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्यावर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो.असा देखील संवाद आहे असं दिसतंय.