तुषार सिंचनचा ‘या’ जिल्ह्यातील 1 हजार 750 शेतक-यांना लाभ; 3 कोटींचे अनुदान वितरण

वर्धा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत जिल्हयातील 1 हजार 750 शेतक-यांना सिंचनासाठी तुषार सिंचन संचाचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रणालीव्दारे शेतक-यांच्या बँक खात्यात 3 कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. सिंचनासाठी तुषार सिंचन ही किफायतशिर आणि शेतक-यांची मागणी असलेली सिंचन पध्दती असून जास्तीत जास्त शेतक-यांना याचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिका-यांनी कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर तर जिल्हयातील उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतक-यांना विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी तुषार सिंचन ही अतिशय उपयुक्त योजना आहे. शेतक-यांकडून या योजनेचे मोठया प्रमाणात मागणी केली जाते. योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तुषार सिंचन संचाचा लाभ दिला जातो. तुषार संचाव्दारे कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळवता येते.

योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अल्प, अत्यल्प, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व महिला लाभार्थ्यांना 55 टक्के तर उर्वरित शेतक-यांना 45 टक्के अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. जिल्हयात आतापर्यंत 1 हजार 750 शेतक-यांना योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांना देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम 3 कोटी इतकी आहे. तालुका निहाय लाभ दिलेल्या शेतक-यांमध्ये आर्वी तालुका 159 शेतकरी, आष्टी 116, देवळी 254, हिंगणघाट 155, कारंजा 50, समुद्रपूर 244, सेलू 446 तर वर्धा तालुक्यातील 326 शेतक-यांचा समावेश आहे.

योजनेअंतर्गत विहीर पुनर्भरण व बिजोत्पादन हा अतिशय चांगला उपक्रम कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. रेशीम शेती सुध्दा शेतक-यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे या बाबीसाठी जास्तीत जास्त शेतक-यांना सहभागी करुन त्यांना लाभ द्यावा, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. यावेळी कृषी प्रक्रीया उद्योग योजना, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम व पिक कापणी प्रयोगाचाही जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला.

फळपिकांसाठी 134 शेतक-यांना ठिबक सिंचन फळपिकांसाठी ठिबक सिंचन उपयुक्त आहे. या सिंचनाव्दारे फळ झाडांना पाणी दिल्यास अतिशय कमी पाण्यात ओलीत होऊन पिकांची वाढ होते आणि उत्पादनही चांगले मिळते. त्यामुळे फळपिक घेणा-या शेतक-यांना योजनेअंतर्गत ठिबक सिंचन संचाचा लाभ दिला जातो. जिल्हयात 145 फळ उत्पादक शेतक-यांना याचा लाभ देण्यात आला असून यासाठी 94 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

हे देखील पहा