अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी

मुंबई – राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मान्यता दिली.

यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवानिवृत्ती,राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.

अशा एक रकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरीता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता हा निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने (Department of women and child development) सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.