बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री दिल्यास त्याला 100 टक्के विरोध करणार; मातब्बर आमदाराची थेट वाॅर्निंग 

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात सत्ताधारी पक्षांना न्यायालयाने दिलासा दिल्याने आता राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार  हा छोटेखानी असेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतूनच तसे आदेश शिंदे-फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती  मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे हा छोटेखानी विस्तार केल्यानंतर काही इच्छुकांची महामंडळावर बोळवण होऊ शकते.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी आता रस्सीखेच सुरु झाली असून मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप (BJP) किंवा शिवसेनेच्या (Shiv Sena) एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री (Guardian Minister) दिल्यास त्याला 100 टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील (Bhandara) शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी दिला आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) आता निर्णय घ्यायलाच पाहिजे, असंही नरेंद्र भोंडेकर म्हणाले.

जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर, जिल्ह्याचा पालकमंत्री असायला हवा. मला जर मंत्रिपद देत नसाल तर, भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. अन्य जिल्ह्याला ज्या पद्धतीने स्थानिक पालकमंत्री देता, त्या पद्धतीने भंडारा जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री द्यावा, या मागणीला माझं समर्थन आहे. परंतु, बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री दिल्यास त्याला 100 टक्के विरोध होईल, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले.