पुणे परिमंडलामध्ये वीजबिलांपोटी १४६ कोटींची थकबाकी; वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई

पुणे : पुणे (Pune) परिमंडलातील ६ लाख ३६ हजार ५४१ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १४६ कोटी १४ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये ५ लाख ४९ हजार ३९७ घरगुती ग्राहकांकडे ९३ कोटी ५० लाख रुपये, ७५ हजार ४७ वाणिज्यिक ग्राहकांकडे ३३ कोटी ६८ लाख रुपये तसेच १२ हजार ९७ औद्योगिक ग्राहकांकडे १८ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

पुणे शहरात २ लाख ४२ हजार ९३७ घरगुती ग्राहकांकडे ३४ कोटी ८२ लाख रुपये, ३७ हजार ८७९ वाणिज्यिक ग्राहकांकडे १३ कोटी ३४ लाख रुपये, ३ हजार २२४ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे शहरातील एकूण २ लाख ८४ हजार ४० वीजग्राहकांकडे ५० कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी आहे.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात १ लाख १ हजार ३५ घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ५० लाख रुपये, १६ हजार ९३५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी ७ लाख रुपये, ४ हजार ७९६ औद्योगिक ग्राहकांकडे ८ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एकूण १ लाख ३१ हजार ७६६ वीजग्राहकांकडे ३५ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये १ लाख ९६ हजार ४२४ घरगुती ग्राहकांकडे ४० कोटी १६ लाख रुपये, २० हजार २३३ वाणिज्यिक ग्राहकांकडे १२ कोटी २५ लाख रुपये, ४ हजार ७७ औद्योगिक ग्राहकांकडे ८ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांनी त्वरीत थकबाकीचा भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी तसेच चालू वीजबिल नियमित भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

शनिवारी व रविवारी वीजबिल (electricity bill) भरणा केंद्र सुरु – वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. १८) व रविवारी (दि. १९) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. यासोबतच लघुदाब वीजग्राहकांना थकबाकी व चालू बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

 

You May Also Like