Swarjankar Mahotsav : १४ व्या स्वरझंकार महोत्सवात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण

Swarjankar Mahotsav : व्हायोलिन अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या स्वरझंकार महोत्सवाला आजपासून म्हणजेच गुरुवारपासून (दि.५ जानेवारी) सुरुवात होत असून दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अनुभविण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे.

कर्वेनगर परिसरातील डी पी रस्ता येथील पंडित फार्म्स या ठिकाणी रविवार ८ जानेवारी पर्यंत महोत्सव संपन्न होईल. महोत्सावाच्या पहिल्या दिवशी ( गुरुवार, ५ जानेवारी) ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. मीता पंडित यांचे गायन होईल. यानंतर प्रसिद्ध संतूरवादक राहुल शर्मा आपले सादरीकरण करतील. पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू व शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या ‘यु ट्यूब कलेक्टीव्हस’ कार्यक्रमाने महोत्सवाच्या पहिला दिवसाचा समारोप होईल.

दुसऱ्या दिवशी (शुक्रवार,६ जानेवारी) रोजी गायिका नबनिता चौधरी यांचे गायन आणि सुप्रसिद्ध तालवाद्यवादक सेल्वा गणेश, तबला वादक पद्मश्री पं विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचा ‘मेलोडीक रिदम’ हा कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर विदुषी आश्विनी भिडे यांचे गायन होईल.

तिसऱ्या दिवशी (शनिवार, ७ जानेवारी) सुप्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन, व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन, प्रसिद्ध सतारवादक पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज यांचे सतारवादन सादर होईल. पंडित अतुलकुमार उपाध्ये आणि उस्ताद शाहिद परवेझ यांच्या व्हायोलिन – सतार जुगलबंदीने या दिवसाची सांगता होईल. महोत्सवात चौथ्या आणि शेवटच्या दिवशी (रविवार, ८ जानेवारी) ज्येष्ठ गझल गायक हरिहरन हे गझल सादर करतील. त्यानंतर गायक उस्ताद राशिद खान यांचे गायन होईल. हरिहरन आणि उस्ताद राशिद खान यांच्या गझल – गायन जुगलबंदीने या महोत्सवाचा समारोप होईल.