युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर, पुण्यातील १६ विद्यार्थी सुखरूप पोहोचले

पुणे – युद्धग्रस्त युक्रेन मधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले  पुणे शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशी असलेले अशा १६ विद्यार्थ्यांचे (शनिवारी)  रात्री  १.३० वाजता पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी भाजप पुणे शहर पदाधिकारी आणि गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पुष्पहार घालून आणि पेढे भरवून स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय सुद्धा हजर होते

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. काही पालकांनी आपल्या मुलांसाठी केक आणला होता तो कापून विद्यार्थ्यांनी सुटकेचा दिलासा व्यक्त केला .

आपल्या मुलांना युद्धग्रस्त संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले . या विद्यार्थ्यांनी कुटुंबियांच्या समवेत हा आनंदाचा क्षण अनुभवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

या प्रसंगी बोलताना खत्री म्हणाले, या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आमच्या एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू होते. कारण आपले आणखी काही बांधव तिकडे अडकले आहेत. तरीही हे बांधव मायदेश परतले यांचा आनंद आहे. मोदींसारखे नेतृत्व असल्यामुळे हे सर्व शक्य होऊ शकले. मोदी है तो मुनकीन है अशीच आमची भावना आहे.