मुंबईतील आणखी 2 व्यक्ती ओमिक्रॉनच्या विळख्यात

मुंबई – मुंबईतील आणखी 2 व्यक्तींना ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाल्याचं राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिलेल्या अहवालानुसार सिद्ध झालं आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता 10 झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तिला आणि त्याच्या अमेरिकेवरून आलेल्या 36 वर्षीय मैत्रिणीला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असून त्यांना सेवेन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोन्ही व्यक्तींनी फायझर लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. दोघांनाही कोणतीही लक्षणं नसून त्यांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या 5 आणि कमी जोखमीच्या 315 निकटसहवासीतांचा शोध सध्या सुरू आहे.

दरम्यान, मुंबईत ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळल्यामुळे महापालिका सतर्क झाली असून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. मुंबई क्षेत्रातील रुग्णालयात आणि कोविड निगा केंद्रात 70 हजार खाटांची व्यवस्था केली असून गरजेनुसार त्यामध्ये वाढ केली जाईल अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.