मालेगावात काँग्रेसला मोठं खिंडार, तब्बल 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : महाविकास आघाडीत मांडीला डी लावून सत्तेचा उपभोग घेणारे पक्ष एकमेकांच्या पक्षाला कसे संपवत आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. कारण राष्ट्रवादीने मालेगावात काँग्रेसला मोठं खिंडार पाडले आहे. मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह 28 नगरसेवक यांनी पक्षांतर केलं. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

राष्ट्रवादी बदनाम होणार नाही, पक्षाला गालबोट लागणार नाही आणि जनतेच्या मनात चुकीची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी या सर्व नगरसेवकांना दिल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र सत्तेत असले तरी या तिन्ही पक्षात पक्षवाढीसाठी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. आज काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.