शिक्षकांची 30,000 रिक्त पदं लवकरच भरली जाणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

Mumbai – शिक्षकांच्या जुन्या निवृत्तीवेतनाबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यम मार्ग काढू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिलं.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 17 व्या त्रैवार्षिक महाअधिवेशनाची सुरुवात काल वेंगुर्ल्यात झाली; त्यावेळी ते बोलत होते.

उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम शिक्षक करत असतात,तंत्रज्ञान कितीही विकसित झालं;तरी शिक्षकांची जागा कोणी घेऊ शकत नाही,असं मुख्यमंत्री म्हणाले.

आमचं सरकार शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची बंधनं टाकणार नाही असं सांगून शिक्षकांची 30,000 रिक्त पदं लवकरच भरली जातील; तसंच राज्यातल्या 4,860 केंद्र प्रमुखांची पदं देखील लवकर भरू अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. दोन दिवसांच्या या अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो शिक्षक वेंगुर्ल्यात आले आहेत.