पुणे मनसेला मोठा हादरा; वसंत मोरे यांच्या खंद्या शिलेदारासह 400 कार्यकर्तेही पक्षातून बाहेर

पुणे – पुण्यात मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या नाराजीची चर्चा असतानाच दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी केली आहे. यानंतर आता माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पुणे मनसेला मोठा हादरा बसला आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. माझिरे यांची हकालपट्टी आणि राजीनामा यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. काही महिन्यांपूर्वी निलेश माझिरे यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा वसंत मोरे यांनी माझिरे यांना शिवतीर्थवर नेऊन राज ठाकरेंसोबत त्यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. परंतु, अवघ्या पाच महिन्यांतच राज ठाकरे यांनी निलेश माझिरे यांची पदावरून उचलबांगडी केली.