ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार ?

मुंबई – शिवसेनेचे विदर्भातील जिल्हाप्रमुख ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात येणार आहेत. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे येत्या हिवाळी अधिवेशनातच ठाकरे गट फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

विदर्भातील ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी शिंदे गटात येणार आहेत. या शिवाय विदर्भातील ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुखही शिंदे गटात येणार आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनावेळी विदर्भात पूर्व विदर्भाचा मेळावा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करतील. शिंदे गटाकडून ठाकरे गट आणि काँग्रेसला दिलेला मोठा धक्का असेल असं त्यांनी म्हटंल आहे.