प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा, टॉप्स ग्रुपविरोधातला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी टॉप्सग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन लिमिटेडच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. तपासात प्रगती होत नसल्याने क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारणे हा आमदार सरनाईक यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कारण ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत त्याची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश पण देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याच प्रकरणाच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी केली होती.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटले. याच रिपोर्टच्या आधारावर अटकेत असलेल्या आरोपींनी ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टात अर्ज केला आहे. अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक शशिधरन यांनी कोठडीला विरोध करत आता दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे.

ईडीच्या अटकेत असलेले अमित चांदोले हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आहेत. मूळ प्रकरणात ईओडब्ल्यूनं सादर केलेला ‘सी समरी’ रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला आहे. त्यामुळे आता ईडीनं दाखल करून घेतलेल्या प्रकरणाला अर्थ उरत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पीएमएलए संदर्भात नुकत्याच दिलेल्या निकालावर ही याचिका आधारीत आहे. याच निकालानुसार मुंबई सत्र न्यायालयानं नुकतीच ओमकार ग्रुपच्या दोन विकासकांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान,  मुंबई सत्र न्यायालयाकडून ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तोपर्यंत आरोपी चांदोले आणि शशिधरन यांना कोठडीतच ठेवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले.