राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल

Hemant Rasane :  कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक मतदानात काल भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते, याप्रकरणी रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केलेल्या रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली होती.निवडणूक अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता रासने यांच्यावर काय कारवाई होते, हे लवकरच कळेल. रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी काल शांततेत मतदान झालं. दिवसअखेर, चिंचवड विधानसभा मतदार संघात 50. 47 टक्के तर, तर कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 50.6 टक्के मतदान झालं. कसबा मतदारसंघात भाजपा शिवसेना युतीचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीतर्फे, कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहूल कलाटे यांच्यात तिहेरी लढत आहे. या दोन्ही मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे.