घामाची ओल धरून : कर्नाटकातील आबा पाटील यांचा मराठीतील कवितासंग्रह

धुळे – [घामाची ओल धरून•] [आबासाहेब पाटील]
[कविता संग्रह] [वाचून मला काय वाटते]

एखाद्या कवितेचे आकलन होणे म्हणजे त्या कवितेतील अनुभवाचा साक्षात प्रत्यय येण्यागतच आहे. अशा प्रकारच्या प्रत्ययाला कवितेची प्रतीती असे म्हणतात. कवितेचे आकलन किंवा ग्रहण भाषेच्या, शैलीच्या, अनुभवाच्या पातळीवर झाले की कवितेची प्रतीती येते. थोडक्यात, कवितेचे आकलन म्हणजे केवळ आशयानुसार आकलन नसते तर कवितेला रूपत्व देणारे शब्द, नाद, संकेत, प्रतिमा, प्रतीक इत्यादी घटकांचे परस्परानुसंधान शोधणे, त्यांच्यातील परस्परसंबंधांचे स्वरूप लक्षात घेऊन या घटकांमुळे कवितेचा एकात्म प्रत्यय आपल्याला कसा येतो ते विशद करणे म्हणजे कवितेचे आकलन असे म्हणता येईल. ‘घामाची ओल धरून’ या संग्रहातील काही कविता अशाच आहेत. ज्यात ‘कवितेची वही’ या कवितेत कवी लिहितात :-

‘लग्नाचं वय निघून गेलेल्या
पोरींचे डोळे बोलतात जी भाषा
त्याच भाषेत बोलते माझ्यासोबत
कवितेसाठीची कोरी वही’ ( पृष्ठ : १०)

प्रस्तुत कवितेत जितका आशय, प्रसंग बोलका वाटतो तितकाच तो रूपक वाटतो. पहिल्या ओळीत जी खंत ‘लग्नाचं वय निघून गेलेल्या’ची दिसते तितकीच अस्वस्थता ‘पोरींचे डोळे बोलतात जी भाषा’ यात दिसते. आणि हे गाव शहराच्या उंबरठ्यापरात लाभलेलं वर्तमान आहे. समाज संकेतांपेक्षा मानवी संकेतं जगण्यालायक असतात. विशेष ते जगले जातात, जगून घ्यावे लागतात. सदर कवितेत जी डोळ्यांची भाषा जाणवते ती दुहेरी आहे. ही भाषा आपुलकीची आहे, आशावादी आहे. आपल्या वाटेला आलेला वर्तमान जितका वैचारिक आहे तितकाच लग्नाचं वय निघून जातांना आपुलकीने हळवा करणारा तो क्षणही आहे कवितेच्या कोऱ्या वहित येतांना. आणि हा वर्तमान एका पोरीचा नाही!, नाही तो एकाच कवी कवयित्रीच्या कोऱ्या वहिचा संदर्भ आहे… काळजाची कळ ज्यांच्या हिश्याला आलेली दिसते तिथे हा भोग आहे, जगणं आहे, अनुभवणं आहे म्हणून इथे काल्पनिकता उद्भवत नाही.

‘पगारानं मिळतात माणसं रडायला

हे कळल्यापासून
हक्काच्या मांडीवरच
जीव सोडण्याची हौस
विरघळत चाललीय हळूहळू’ (पृष्ठ : २६)

‘शेवटची इच्छा’ ह्या वरील कवितेच्या ओळींमध्ये जो भाव आहे तो भूतकाळाने निर्माण केला आहे आणि वर्तमानास तो संदर्भ भेटल्यावर त्यास टवटवीत करू पाहतोय. जरका पगारानेच माणसं मिळू लागलीत माणसांच्या मढ्यावर रडायला ! मग मरण स्वस्त झालंय असं वाटत नाही का? नात्यातील ओलावा कमी होऊ लागलाय असं वाटत नाही का? मग काळाच्या प्रवाहात ही वृत्ती माणूस जगत चाललाय की ही वृत्ती घेऊन माणूस काळ जगत चाललाय? हक्काच्या मांडीवर जीव सोडण्याची हौस खरंच विरघळत चाललीय हळूहळू..! खरंतर नातं असतं बंधन ते जगात टिकावावी लागतात पण रक्ताच्या नात्यांसाठी रक्ताच्या बाटल्या शोधाव्या लागतात. म्हणून ह्याच कवितेच्या शेवटच्या कळव्यात कवीला आशादायक म्हणावेसे वाटते की, ‘जीवाभावाच्या उरातूनच / फुटावा हुंदका / हा हट्ट धरवेना हल्ली / पगारी आसवांचा हिशोब / जागेवरच चुकता करेल / किमान एवढे तरी सधन हवे निमित्त मरणाला.’

ग्रामीण भागात आजही बऱ्यापैकी रूढी, परंपरा, चालीरीती, प्रतिके व प्रतिमा नजरेस भरणाऱ्या आहेत. पण काही प्रतिके संकेत वाटतात तर काही रूढी जाचक प्रथाच. पण परंपरा आणि नवतेचा विचार केला तर शिक्षित पिढीला पण काही मिथके, प्रतिके लागू होण्याएवजी स्विकारण्याचाच सराव झालाय असा वर्तमान दिसतो. वडाचे झाड, तुळस, नदी, आसरा असे अनेक मिथकांचा भारतीय स्रीजीवनात ज्याप्रकारे महत्त्वाचे स्थान दिसून येते त्याच प्रकारे स्त्रियांच्या भावविश्वातील अनेक विधीनिषेधांशी संबंधित मिथके लोकसमूहाच्या सर्जनशील व अनुभवसिद्ध श्रध्दाभावनांचे दर्शन घडताना दिसून येते. –

‘लग्न लागताच
तिला सोडून
तो दूर गेला घाई घाई
पुन्हा नव्या नवऱ्यासाठी
पुन्हा वयात आली रूई’ (पृष्ठ : ३०)

वरील ‘रूई’ (रूईचं झाड अथवा रोपटं) या कवितेच्या ओळीत ‘रूई’ हे मिथक आहे तर ‘रूई’तली प्रतिमा नवतरनी, विवाहाच्या वयाची झालेली नवविवाहीता आहे. ग्रामीण भागात एखाद्या मुलाच्या कुंडलीत दोन विवाहाचे योग असतील तर पहिलं लग्न टिकणार नाही.! असं सांगितलं जातं,(सांगणारे नातेवाईक व ज्योतिष असतात) त्यासाठी त्याचं पहिलं लग्न रूईशी केलं जातं. असा हा गुढ अर्थ ह्या कवितेतला आहे आणि हे गावपरात एखाद्या संदर्भ लाभलेल्या लग्नाच्या वयात आलेल्या पोराचं निच्छल वर्तमान आहे. हा प्रसंग कुणाला संकेत वाटेल तर कुणाला अंधश्रद्धापण वाटेल. ‘लग्न लागताच / तिला सोडून / तो दूर गेला घाई घाई’ ही प्रक्रिया होऊन गेल्यावर तो नवरदेव पुन्हा परतून रूईत आपली बायको पाहत नाही, कारण त्याला ही प्रक्रिया करून घ्यायची असते हाडामासाच्या पोरीसोबत लग्न करण्यासाठी. तसेच कवी त्या रूईचे अस्तित्व समजून घेताना उल्लेख केल्या शिवाय रहात नाही. की, ‘पुन्हा नव्या नवऱ्यासाठी / पुन्हा वयात आली रूई’ ही ओळ चिंतन करायला लावणारी आहे. कारण रूईला पण अस्तित्व आहे. ती द्रोपदीपेक्षाही नवऱ्यांच्या बाबतीत शतकानुशतके ओलांडून जाणारी आहे. रूढी, प्रथा, संकेतांच्या बाबतीत हा काळ जरी वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवत असला तरी जुने जाणकार माणसे ते मान्य करीत नाही. पिढ्यानपिढ्यांची साल काढून घेतात मरेपर्यंत.

‘आई फक्त जाहीर करते
मी बैल असल्याचं
तिला दिसत नाही
माझा सुजलेला खांदा
नाकपुडीत रूतलेली वेसण’

प्रस्तुत ‘भास’ कवितेत घरपरात पुजलेले हे वर्तमान दिसून येते. नुकतंच लग्न झालेल्या पोराला बायकोचा बैल होऊ नये म्हणून आई कशी टोचून बोलते तो प्रसंग मनाच्या पडद्यावर झळकताना दिसतो. आईला खात्री असते की पोरगं काही दिवस – वर्ष आपला शब्द धुतकारून जाणार नाही पण; कधी कधी सून घरात असताना सासुबाई प्रसंग सुटू देत नाही म्हणून सून ‘हूं’ सुधिक करणार नाही. मग ती सून तिच्या नवऱ्याला कुठल्या दृष्टीने पाहते! हे त्याच कवितेतील पुढिल प्रति प्रसंगाला स्पष्टपणे कवी म्हणतात –

‘बायको तर धूर्त
ती वडाच्या बुंध्याला गुंडाळते
सातपदरी दावं
सातजन्म ह्योच बैल
‘बांधता यावा गोठ्यात म्हणून'(पृष्ठ : ३४)

हा ग्रामीण पुरूष मनाचा संदर्भ आई आणि बायकोच्या मध्ये असणं म्हणजे डोक्याची दही नी काळजाची लाहीलाही करण्यासारखाच आहे.! ‘बैल’ ही प्रतिमाच आयुष्य झिजवणारी आहे. स्रीवाद जितका काळाला लागू आहे तितकाच पुरूषवादही काळाला लागू आहे. पण पुरूषी मन पुरूषवाद फारसा लिखाणात आणत नाहीत, कारण बऱ्यापैकी पुरुष पुरूषवादी भाव जगून घेण्याचा प्रयत्न करतात असला प्रसंग, आणि स्री सहन करून घेते तिचं वर्चस्व येईपर्यंत गृह अस्तित्वाची पात्रे बदलताना.

‘आय एम सॉरी’ ह्या कवितेत दोन युगांचा, दोन भाषांचा, मूर्त – अमूर्ततेचा मेळ दिसून येतो. ही कविता वाचायला सोपी वाटते पण तिचा विस्तारणारा आशय जागतिक पातळी गाठतो. तसेच ‘ज्ञानदेवा’ , ‘कर्म फळा आले’ ह्या ही कविता समकालीनतेच्या दृष्टीने जागतिकीकरणाच्या वाटतात. ‘दृष्टांत’ कवितेत तर कवीने वर्तमानाच्या ओल्या जाणीवा व्यक्त केलेल्या आहेत. त्या अशा की,

‘सरड्यांनी शिकवली आहे
सापांना रंग बदलण्याची कला
कुठल्या फांदीवर ठेवावा भरवसा पाखरांनी?'(पृष्ठ : ४३)

किती अलगद व साध्या सोप्या शब्दातून अस्वस्थता निर्माण करतात कवी वरील कवितेच्या ओळींमधून! नैसर्गिक गुणधर्म मानवी मनातून जगण्यात येताना पाखरं मनाच्या माणसांनी जगावं तरी कसं? ‘कुठल्या फांदीवर ठेवावा भरवसा पाखरांनी?’ हा प्रश्न म्हणजे भुईवरील अस्तित्वाची क्षणे जगू पाहणाऱ्यांना अस्वस्थ करणारा आहे. ‘ज्ञानदेवा’ ही कविता प्रश्न निर्माण करणारी आहे. हा प्रश्न दोन युगातील संदर्भांचा आहे. दोन पुरूषी मनाचा आहे. ज्ञानदेवांनी भिंत चालवली म्हणून कवी ज्ञानदेवांना ग्रेटच म्हणतात पण वर्तमानाची कळ ज्ञानदेवांना सांगताना कवी एकाएकीच प्रश्न निर्माण करतात, –

‘एवढा चमत्कारी नव्हता
आमचा बाप ;
पण कसं काय कुणास ठाऊक
त्यानं चालविलं
चार भिंतीचं अख्खं घर?
तेही हयातभर.?’ (पृष्ठ : ५८)

काळाच्या प्रवाहात अभ्यासक्रमात जरी ज्ञानदेव पिढीपरात लाभलेले असले, तरी कवी बापाचा दैनंदिन अभ्यासक्रम विसरत नाही. हा अभ्यासक्रम त्यांचा तोंडीपाठ आहे म्हणून घामाची ओल धरताना कवीला बापाचं जगणं विसरणं अशक्यच वाटतं. मातीत राब राब राबून जरी बापाची हाडं मातीत दफन होऊन त्याची भुसभुशीत माती झाली तरी पिढीपरात घर चालवण्यासाठी बाप लागतोच! नाही तर घर चालवण्यासाठी घराचा बाप व्हावा लागतो. म्हणून कवीला बाप ग्रेटच वाटतो.

बाप जसं घर चालवतो तशीच आई पिढी चालवते. पिढी घडवते. घरातील सदस्यांना संस्काराचे सल्ले देतांना आई उंबरठ्या बाहेरील जगाचाही मूळ चेहरा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते. विशेष आतील आणि बाहेरी जगात जगायचं कसं? वावरायचं कसं? हे देखील जीवतोडून सांगते. पण; वयाने लहान बुध्दीने महान कधी कधी आईचे संस्कार, सल्ले कसे नाकारतात याचंच उदाहरण कवी ‘की आणखी काही’ कवितेतनं देतांना म्हणतात –

‘आई फक्त
‘डोक्यावर पदर घे’ म्हणाली,
तेव्हा तू
अख्खं घरंच डोक्यावर घेतलंस.!’ (पृष्ठ : ६५)

आजच्या पोरी सासरी नांदायला गेल्या की, त्यांना सकारात्मक संस्कारशील सल्ले आवडत नाही. ते मान्य करीत नाही, जग बदललं तसं त्यांना बदलायला – रहायला आवडतं. पण हा ‘पदर’ काही बंधन नाहीये! तर पदर स्रीपिढीचा आदर आहे आणि हा पदर समोरील व्यक्तीबरोबर स्वतःलाही आदर निर्माण करून देण्यासाठी असतो. पदर डोक्यावर घेतला की घराबाहेर जातांना नजरे बरोबरच बघण्याचा दृष्टीकोन पण बदलतो. पत्नी म्हणून लाभलेला स्रीकाळ कुंकवाचा मोठा टिळा टाळतोय, बायको ऐकून घेत नाही आई – आजीचं सांगणं, मग जेव्हा लेकीच्या वाटेला बोचक वर्तमान येतो तेव्हा –

‘आता वयात आलेली लेक
घराबाहेर पडताना
हजार सूचनांनी झाकतेस तिचं अंग
नखशिखांत
आई, अक्का आणि आजीच्या
भाबड्या अंधश्रद्धांना
चिरशांती मिळावी म्हणून
की… आणखी काही.?’

भावनांच्या जाणीवा भेदक असतात कारण काळ अनुभवत नाही तर अनुभव देऊन जाणारा असतो. नक्षत्रांच्या देखणंपणात पिढीचा कोंब जबरीनेच फुटू नये म्हणून बाप माणसाला काळजी वाटते. हिच जाणीव जेव्हा लेकीच्या आईला होते तेव्हा फार उशीर झाला असतो. गतकाळाच्या शिकवनी भाबड्या जरी असल्या तरी त्यात ओलावा असतो आपुलकीचा आपल्यांसाठी…

प्रसार माध्यमांचे लेखन कौशल्य आकर्षक असते, यात विशेष त्यांच्या जाहिराती. एखादी प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आश्वासक भाषेत ‘ही वस्तू वापरण्यास अतिशय चांगली आहे’ ह्याची ग्वाही जेव्हा देते तेव्हा ‘पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे’ घडी ह्या जाहिरातीची सूचनेचा विचार वर्तमान माणसांनी केला पाहिजे. जाहिराती ग्राहकांची फसवणूक करतात, याचा अनुभव संतूर साबनाची जाहिरात सर्रास देते. ती संतूर साबन लावणारी एका मुलीची आई विवाहित वाटत नाही. मग वय लपविण्याची व सौंदर्य वाढविण्याची कला संतूर साबनात असावी का? कृषी विभागाचा विचार करताना पण अशा काही जाहिराती असतात ज्या शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करतात. जे कमी पाण्यात पीक अधिक घ्यायचे फायदे सांगतात. खोल नांगरणीसाठी पारंपरिक नांगराचा उपयोग न करता ट्रॅक्टर विकत घेऊन अधिक सल्ले द्यायचे प्रयत्न करतात. भुईच्या गरजेपेक्षा तडतड आतड्या तोडतात. माणूस आणि मशिनीची तुलना जाहिरात करते. बियाण्यांची पॅकिंग पाकिटात कशी भेसळ करतात, कपाशीच्या बोंडातून कशी उकलतात नोटांचे बंडलं… मग ऐन सिझनात कळतो जाहिरातींचा मुळ चेहरा. म्हणून कवी ‘कृषी सेवा केंद्रात’ल्या कवितेत म्हणतात –

‘औषध पिऊन केलेला
आत्महत्येचा प्रयत्नही फोल ठरतो
तेव्हा कळतं बळीराजाला की,
फवारणीच्या बाटलीसोबत
मोफत मिळतो विश्वासघात
कृषी सेवा केंद्रात.’ (पृष्ठ : ७६)

ही गतग्रामीण असंख्य शब्दकळा सोसायला लावणारी आहे. मरणाला सामोरे जाण्यापूर्वी शेतकरी शिकत असतो जगणं. बारोमास मातीत राबून कुठल्याही शेतकऱ्याला आपली व आपण उगवलेल्या पिढीची माती होऊ नये, असे दर हंगामात वाटते. कधी कधी कृषीप्रधान देशाच्या शेतकऱ्याला नदारी ही जगावीच लागते कारण ही ‘नदारी’ गरिबी नसते! तर ती व्यक्तीच्या वाटेला आलेली क्षणिक, दिवसीय परिस्थिती असते. पण ही क्षणिकता आणि ते दिवस जगत असताना नदारी माणसाला लाचार करून टाकते. अशावेळी नदारी आलेल्या व्यक्तीवर किंवा त्याच्या परिवाराला पाहून जेव्हा कुणी हसतं तेव्हा त्या हसण्यामागचा गुढ अर्थ इतका सहज कळत नाही. पण कवी जगप्रसिद्ध ‘मोनालिसा’चं चित्र पाहून तिच्या हसण्यामागचं गुढ कसे परिस्थितीला अनुसरून उकळतात, हे आपल्याला पुढिल कवितेच्या ओळीतनं वाचताना जाणवते.

‘माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत
अशीच हसत रहा मोनालिसा!
तुला हसताना पाहून
मलाही बरं वाटतं
तुझं हसणं
भाकरी इतकं सुंदर वाटतं;’ (पृष्ठ : ९७)

ज्याचं जगणं भाकरीसाठी असते ते भाकरीशिवाय जगाचा इतका विचार पण करणार नाहीत. भाकरीचा शोध माणसाच्या मरणापर्यंत सुरूच असतो. कारण भाकरीची प्रतिमाच भुकेची तिव्रता वाढवणारी असते. भाकरीचा शोध गुगलवरही घेता येईल पण भाकर डाऊनलोड करता येणार नाही त्याचं काय? सामान्य माणसाची हयात भाकरीचा शोध संपेपर्यंत सुरूच राहतो, माणूस संपून जातो पण पिढीपरात भाकरीचा शोध सुरूच राहतो. अडचणीतल्या वेदनेत जेव्हा हसू पाहतो माणूस तेव्हा जिंदगी जगू पाहतो माणूस. तरीही असली हयात जगताना कवीला पुढे हसणाऱ्या मोनालिसाला प्रश्नार्थक सांगावेसे वाटते,

‘मोनालिसा,
संसाराच्या रथाला खांदा लावला असतास
तर कमरेत वाकली असतीस
दारूड्याची दोन लेकरं सांभाळताना
मेटाकुटीला आली नसतीस?
शपथ घेऊन सांग मोनालिसा!
उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढं
तू अशीच हसली असतीस?’

कवीने ‘मी पहिल्या पावसाचं गाणं’ या कवितेतही हसण्याविशेष लिहिलंय, हे शब्दलयीन आहे जे साध्या सोप्या शब्दातून विचार करायला लावणारे आहे. ग्रीष्मात अंगाची लाही लाही होतांना गाव – रान उधास करणारे लामीनचे(वाढते) दिवस हवे तसे अल्प रात्रींना गारवा नाही देत, लक्ष लागून असते पहिल्या पावसाकडे. –

मी पहिल्या पावसाचं गाणं
कागदावर उतरवताना
माती हसते…
कपाळ करपरल्या विधवेसारखी!’ (पृष्ठ : ११७)

कपाळ करपरल्या विधवेसारखी! ह्यातले उद्गार चिन्ह गंभीरता स्पष्ट करणारे आहे तसेच प्रत्येक वाचकाला हवा तसा अर्थ ही ओळ वाचताना लावता येईल. कवितेचं गाणं होणं गरजेचंच असतं असं काही नाही… कधी कधी कवितेची गंभीरताही ओठांवर रेंगाळत असते पण; त्यातली गुढता मनाला समजून घ्यायची नसते फक्त करून घ्यायचा असतो सराव क्षणपरात.

आधुनिक मराठी साहित्यामध्ये विविध प्रवाह निर्माण झाले आहेत. या प्रवाहांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. विशेष ग्रामीण प्रवाह. ग्रामीण कवितेचा विचार करताना कोणत्या स्वरुपाच्या कवितेला ‘ग्रामीण कविता’ म्हणायची! हे स्पष्ट होणे गरजेचे वाटते. ग्रामीण वास्तवाला केंद्रस्थानी ठेवणारी कविता स्वाभाविकपणेच वास्तवाभिमुख राहते. म्हणजे ग्रामीण साहित्याचा वास्तवशील प्रवाहाचा एक भाग म्हणून ग्रामीण कवितेचा विचार करावा लागतो. ग्रामीण प्रवाहात अनेक उपप्रवाह जाणवतात जे मूळ प्रवाह होऊन जातात. ‘घामाची ओल धरून’ या संग्रहात ग्रामीण बरोबरच स्त्रीवादी, पुरूषवादी, निसर्ग, प्रेम, जागतिकीकरण, विज्ञान माणूस, वास्तव हे प्रवाह कवितेला रूपत्व, वळण देणारे आहेत. कवितेत जी संकेतं, प्रतीमा आहेत ते ह्या संग्रहाला वैचारिक दृष्टिने भक्कम करणारे आहेत. आबासाहेब पाटील ह्यांच्या लेखनात ग्रामीणता ग्रामीण बोली सौंदर्यात नाही, तर प्रमाण शब्द सौंदर्यात जाणवते. ते ‘शब्दांशिवाय कविता जगणाऱ्या सहजीवांना’ हा संग्रह समर्पित करतात म्हणून बऱ्यापैकी त्यांच्या कविता प्रयोगशील वाटतात. कर्नाटक राज्यात राहूनही त्यांची मराठी लेखनशैली माय मराठी मातीला गौरविणारी आहे. घामाच्या थेंबा थेबांनं फुलावी माती तशीच ही लेखनशैली फुलणारी. आबासाहेब पाटील तुमच्या पुढील लेखनासाठी दरहंगामी आशादायक शुभेच्छा.

••प्रविण पवार••
धुळे

पुस्तकाचे नाव :- घामाची ओल धरून
साहित्य प्रकार :- कविता (संग्रह)
पुस्तकाचे कवी :- आबासाहेब पाटील
पुस्तक प्रकाशन :- शब्द शिवार प्रकाशन
पुस्तक मूल्य : २००/-
वितरक :- ९०४९६६१२६६
:- ९४२३०६०११२