देशात एक वेगळं जातीयवादी वातावरण निर्माण केले जात आहे – शरद पवार

अमरावती  –  राज्य आपल्या ताब्यात आले असले तरी दिवस सोपे नाहीत असे सांगतानाच हे राज्य आपल्या हातात राहिले नाही त्यामुळे अस्वस्थता असलेला एक मोठा वर्ग या राज्यामध्ये आहे असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला.काल अमरावतीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार (Sharad Pawar)  यांनी मार्गदर्शन केले.

साहजिकच आहे देशात सत्ता असल्याने या सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील राज्य संकटात कसं आणता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू आहेत. चौकशा लावल्या जात आहेत, दोन मंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. सतत काही ना काही करुन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांना त्रास कसा देता येईल हा एकमेव कार्यक्रम या राज्यात सुरू आहे. अशावेळी आपली सामुहिक शक्ती उभी केली तर ही शक्ती हाणून पाडायला वेळ लागणार नाही असे स्पष्ट मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

एसटी कामगारांनी (ST Workers)  केलेल्या आंदोलनाचा विषय येथे काढला गेला. गेली ४०-५० वर्ष त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले गेले. यामध्ये कामगारांना दोष देता येणार नाही. नेतृत्व चुकीचे असले की काय होते आणि एसटी कामगारांच्या बाबतीत काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे.सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना चुकीच्या मार्गाने नेण्याचं काम काही लोकांनी केले असे दिसतेय आणि त्याचे परिणामही झालेले आहेत असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

राजकारणात राजकीय जीवनात काम करताना अनेक प्रकारची संकटे येतात. काही आयोजित केलेली असतात तर काही परिस्थितीनुसार येतात. त्या संकटांना तोंड देण्याची भूमिका घ्यायची असते. संकटाना घाबरायचं नसतं तर त्या संकटाला तोंड द्यायचे असते असे मार्गदर्शक विचार सांगतानाच यासाठी मुंबईतील दंगल आणि लातूरचा भूकंप या संकटाशी कसा सामना केला याची माहिती शरद पवार यांनी यावेळी उदाहरणार्थ दिली.

आज आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीतून जावं लागत आहे. देशात एक वेगळं जातीयवादी वातावरण निर्माण केले जात आहे. हिंदू – मुस्लीम करता येईल का? दलित – हिंदू करता येईल का? असं सतत काही ना काही चालू आहे असाही आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.

तुमच्या वाचनात एक गोष्ट आली असेल, काश्मीरमध्ये हिंदू समाजाचे लोक आहेत त्यांना काश्मीर पंडीत बोलतात. एक काळ येऊन गेला दहशतवादी शक्तीनी पंडितांवर हल्ले केले त्यामुळे काश्मीर सोडून त्यांना जावे लागले. त्यांना जावं लागल्यानंतर अलीकडे एक सिनेमा एका गृहस्थाने काढला. त्या सिनेमात हिंदूवर कसे अत्याचार झाले हे दाखवण्यात आले. एखादेवेळी लहान समाज संकटात असतो त्यावेळी त्यांच्यावर मोठा समाज हल्ला करतो आणि काश्मीरमध्ये मोठा समाज मुस्लिम आहे. हे जेव्हा दाखवलं जातं त्यावेळी देशातील हिंदू समाजामध्ये एकप्रकारची अस्वस्थता निर्माण होते. ती अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्याठिकाणी होता. दुर्दैवाने ज्यांचा हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे अशाप्रकारची घोषणा केली याबाबत शरद पवार यांनी खंत व्यक्त केली.

ज्यावेळी काश्मीर पंडितांवर (Kashmiri Pandit) हल्ले झाले त्यावेळी राज्य कुणाचं होतं तर व्ही. पी. सिंग यांचं होतं. त्यांना पाठिंबा कुणाचा होता तर भाजपचा होता. राष्ट्रवादीचा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. भाजप सत्तेवर असताना काश्मीर पंडितांवर हल्ले झाले ती जबाबदारी भाजपला नाकारता येणार नाही असेही शरद पवार म्हणाले.देशात हिंदू – मुस्लिम घडवून त्यांच्यावर अत्याचार सुरू आहेत. हे देशाच्या इतिहासात घडवण्याचं काम होतंय. जेव्हा राज्यकर्ते या दिशेने जातात त्यावेळी अधिक चिंतेचा विषय आहे असेही शरद पवार म्हणाले.

ज्या समाजातील घटकांचा विश्वास आहे त्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी केव्हाही या गोष्टींना पाठिंबा देणार नाही. जो जातीयवाद करतो जो धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करतोय अशांची संगत राष्ट्रवादी कधीही करणार नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आज सर्वात मोठा प्रश्न महागाईचा आहे. याची झळ सामान्य माणसाला भोगावी लागते आहे आज पदवीधर होऊनही नोकरी मिळत नाहीय. या पदवीधरांच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी देशात सत्ताधारी असलेले मोदी सरकार ढुंकूनही बघत नाहीय. राज्यसरकारच्या भूमिकांना विरोध करायच्या दृष्टीने मोदी सरकार काम करत आहे. त्यासाठी तुमची माझी जबाबदारी आहे की सामान्य माणसाचे दु:ख दूर करू असेही शरद पवार म्हणाले.

सांप्रदायिक विचार घेऊन माणसांमध्ये एकप्रकारचे अंतर निर्माण करण्याचे काम कुणी करत असेल तर त्याचा विरोध आपल्याला करायचा आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.पक्षाच्या कामाची वाढ आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी दोन दिवसाचे शिबीर घेण्याची आवश्यकता आहे. जयंतराव पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे सगळ्यांशी चर्चा करुन दोन दिवसाचे मंथन शिबीर घ्यायला हवे असेही शरद पवार म्हणाले.