पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरला सायबर चोरट्यांनी तब्बल दिड कोटी रुपयांना घातला गंडा

पुणे – एका प्रसिद्ध डॉक्टरला सायबर चोरट्यांनी तब्बल दिड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना पॉलिसीचे पैसे परत करण्यासाठी म्हणून पैसे टाकण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे त्यांनी पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी ५७ वर्षीय डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात फसवणूकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.  हा प्रकार २०१७ ते २०२१ या कालावधीत घडला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बिबवेवाडी परिसरात राहण्यास असून, ते प्रसिद्ध डॉक्टर आहेत.

दरम्यान, त्यांची पॉलिसी आहे. यादरम्यान, त्यांना सायबर चोरट्यांनी मेलद्वारे तसेच वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत त्यांना त्यांच्या पॉलिसीचे पैसे परत करू असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून त्यासाठी वेगेवगळी कारणे सांगून १ कोटी ४९ लाख ४४ हजार ४०० रुपये भरण्यास भाग पाडले. तरीही त्यांना पॉलिसीची रक्कम मिळाली नाही.

यादरम्यान, या सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या तब्बल १८ बँकेच्या ४१ बँक खात्यावर हे पैसे भरण्यास सांगितले आहे. त्यांनी याबाबत सायबर पोलीसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलीसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी नियोजनपुर्वक हा गुन्हा केल्याचे दिसत असून, आरोपी परराज्यातील असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.