Chandrakant Patil | पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली येथे ज्यूदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी दिले.
शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आणि पुनीत बालन गृप यांचा सहकार्याने आयोजित 15 ते 18 वयोगटातील कॅडेट श्रेणीच्या कॅडेट गटाच्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेचे उद्घाटन आणि चषक अनावरण कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी युवा उद्योजक पुनीत बालन, इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या अध्यक्षा मनीषा मल्होत्रा- मुखर्जी, ॲक्सिस बँकेचे सईद हैदर तसेच आदित्य गोल्हटकर, भारतीय ज्यूदो महासंघाचे निरीक्षक वीरेंद्र वशिष्ठ आणि सहायक सचिव सी एस राजन उपस्थित होते.
यावेळी पुनीत बालन यांनी शासन सहभागाने जुडोचे निपुणता केंद्र उभारावे अशी विनंती आपल्या भाषणात मंत्री पाटील यांच्याकडे केली. त्यावर पाटील यांनी बोलताना तात्काळ हे केंद्र उभारण्याची घोषणा केली. पाटील पुढे म्हणाले, की देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये खेळ आणि खेळाडूंचा उत्कर्ष व्हावा यासाठी मोदी सरकार प्रयत्नशिल आहे. यासाठी खेळाडू आणि खेळांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या यादीतील खेळाडूंना नोकरीमधील पाच टक्के आरक्षण आणि दहावी तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 25 मार्कांची उपलब्धता करून दिलेली आहे तसेच रोख रकमांचीही तरतूद केली आहे.
पुनीत बालन यांनी या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेतील कॅडेट गटाच्या विजेत्या खेळाडूंसाठी भरघोस बक्षिसांची घोषणा केली. यामध्ये त्यांनी मुलामुलींच्या एकूण 16 वजन गटातील प्रत्येक सुवर्णपदक प्राप्त खेळाडूसाठी 11 हजार , रौप्यपदक प्राप्त खेळाडूसाठी 7 हजार तर दोन कांस्यपदक विजेत्यांसाठी 5 हजार रुपये प्रत्येकी अशी जवळपास पांच लाख रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली.
कार्यक्रमास द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक जीवन शर्मा आणि अर्जुन पुरस्कार विजेते यशपाल सोलंकी, स्पर्धा प्रमुख जे आर राजेश यांसह राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.
दरम्यान या स्पर्धा दिनांक 23 ते 25 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी 29 राज्यातील जवळपास 600 खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि पदाधिकारी यांनी पुणे शहरात आगमन केले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय मग त्याची चौकशी का होत नाही? – Supriya Sule