पडळकर-खोत गेले म्हणून काय झालं ?, आंदोलनाची तलवार म्यान होणार नाहीच !

मुंबई : गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा निघाला नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा केलीय.

त्यानंतर आता आझाद मैदानावर सुरु असणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ‘हे जे आंदोलन आहे ते राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं होतं. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. सरकारनं याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. सरकार कामगारांकडे लक्ष देत नव्हतं त्यामुळं आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसलो होतो, मात्र आपण आता लढाईचा पहिला टप्पा जिंकलो असल्याने आंदोलन स्थगित करत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

एकीकडे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदान येथील आंदोलनातून काढता पाय घेतला असला तरी आंदोलक कर्मचारी मात्र आंदोलांची तलवार म्यान करण्याच्या मनस्थित नसल्याचे दिसत आहे. ऐन दिवाळीत आमच्या ४२ बांधवांनी या आंदोलनासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे आता विलीनीकरणाशिवाय माघार नाहीच अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, ऐन दिवाळीपासून लाखभर एस.टी. कर्मचारी आझाद मैदानात धडकला. आम्हा साऱ्यांची विलीनीकरणाची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन असेच सुरू राहील. सरकारच्या या मागण्या आम्हाला मान्य नाहीत, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे आंदोलक अजून पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील पहा