आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भारताची चिंता वाढली

नवी दिल्ली- दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या व्हेरिएंट करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा असून तो अधिक घातकही आहे. नुकतंच B.1.1.529 या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने ओमीक्रोन असं नाव दिलं आहे.

या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्च शासकीय अधिकाऱ्यांसोबत कोविड 19 ची सद्य स्थिती आणि लसीकरणा विषयीची आढावा बैठक घेण्यात आली. दक्षिण आफ्रिकेमध्ये नव्याने आढळलेल्या कोविड 19 च्या ओमिक्रोन या विषाणू च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ही बैठक घेण्यात आली असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवून त्यांनी कोविड नियमांचं पालन करण बंधनकारक असल्याचं आरोग्य विभागाने म्हंटले  आहे.

दरम्यान, देशात सध्या 1 लाख 7 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचं प्रमाण 32 टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 98.33 शतांश टक्के आहे. कोविड-19 मुळे देशात आजवर दगावलेल्यांची संख्या 4 लाख 67 हजारांहून अधिक झाली आहे.