६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश

नाशिक – भारतीय खेळ महासंघातर्फे दरवर्षी १४/१७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तरावर महासंघाने मान्यता दिलेल्या सुमारे ९० खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत प्रत्येक राज्याचा संघ हा शासनातर्फे आयोजित स्पर्धांमधून निवडला जातो. या स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच चांगली असते मात्र यंदा आपले खेळाडू या स्पर्धे पासुन वंचीत राहतात कि काय अशी स्थिती होती मात्र मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्याकडे भाजप प्रवक्ते प्रवीण अलई (BJP spokesperson Praveen Alai) यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून खेळाडूंचा पुढील मार्ग आता सुकर झाला आहे.

प्रवीण अलई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली दोन वर्षे कोरोना काळ असल्याने व भारतीय महासंघात दोन गट झाल्याने, स्पर्धा होत नव्हत्या. अखेर फेब्रुवारी २०२३ मध्ये एकमत झाल्याने नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.कमी कालावधीत सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी सर्व खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्याने, यंदा फक्त १९ वर्षांखालील शालेय खेळाडूंसाठी २१ खेळांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दिल्ली, भोपाळ आणि ग्वाल्हेर येथे ६ ते १२ जुन दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांकरिता प्रत्येक खेळासाठी राज्याची प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख हि २९ मे आहे.

पुढे बोलताना अलई म्हणाले, देशातील काही राज्यांचे सदर स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर सुरु झाले असता, मात्र देशातील क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात, राज्यातील उगवते खेळाडू या स्पर्धे पासुन वंचीत राहू नये आणि या खेळाडूंच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी लवकरात लवकर २१ खेळांसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात यावे व त्यातून निवडलेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात यावे, यासाठी खात्याचे कर्तव्यदक्ष मंत्री गिरीश महाजन यांना सदर बाब लक्षात आणून देताच त्यांनी राज्य क्रीडा आयुक्त यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने 12 तासाच्या आत परिपत्रक जाहिर करण्यात आल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. या निर्णयाबद्दल मनस्वी आभार व विद्यार्थ्याचे अभिनंदन!