‘ग्योथं इन्स्टिट्यूट’च्या ‘इनफायनाईट लायब्ररी’मधून घेता येणार अनोख्या ग्रंथालयाची अनुभूती

पुणे  : ग्रंथालय म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे वेगवेगळ्या विषयावरील असंख्य पुस्तकांनी भरलेली कपाटे आणि ही पुस्तके वाचण्यासाठी असलेली आसनव्यवस्था. मात्र ग्रंथालयाच्या या पारंपारिक स्वरुपाला छेद देत, ज्ञानार्जनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करत, ही प्रक्रिया अधिक मजेशीर आणि रंजक बनविण्याचा प्रयत्न पुण्यातील ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे करण्यात आला आहे. संस्थेतर्फे व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानावर (Virtual reality technology) आधारित ‘इनफिनाईट लायब्ररी’ (Infinite Library) ही अनोखी संकल्पना सादर करण्यात येत असून याचा अनुभव पुणेकरांना एसएनडीटी कोथरूड समोरील ‘द बेस’ याठिकाणी २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान घेता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही परंतु त्यासाठी तिकीट खिडकीच्या वेबसाईटच्या माध्यमातून पूर्वनोंदणी आवश्यक असणार आहे.

या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे, गुहेच्या आकाराप्रमाणे तयार करण्यात आलेल्या या अनोख्या ग्रंथालयात क्यू आर गेम, होलोग्राम्स, थ्री डी प्रिंटेड ऑबजेक्टस् आणि ऑडीओ- व्हिज्युअल गोष्टी पाहता येणार आहे. यात नागरिकांना व्हर्च्यूअल रिअलिटी’च्या वापराद्वारे भविष्यातील ग्रंथालयाचा एक परिपूर्ण अनुभव घेता येणार आहे. या व्हर्च्युअल विश्वात ‘इनफायनाईट लायब्ररी’ने काही छोट्या ग्रंथालयाची निर्मिती केली असून, यामध्ये निसर्गाशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्हर्च्युअल रूम’मध्ये दक्षिण भारतीय बाहुलीनाट्य, ‘युरोपियन अल्केमी’ आणि जगभरातील ‘पोलीनेशन नेव्हिगेशन’ यांचा समावेश आहे.

उपक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हजेच दिनांक २४ सप्टेंबर रोजी कर्नाटक येथील प्रसिद्ध बाहुलीनाट्य कलाकार गुंडू राजू हे छाया कठपुतळी प्रदर्शनाच्या माध्यमातून "समुद्र मंथना" वर आधारित कथा सादर करतील. या संकल्पनेचे क्रिएटिव्ह डायरेक्टर मिका जॉन्सन हे आहेत. माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी, निसर्ग, संस्कृती यांच्यातील संबंध उलगडून दाखविण्यासाठी व्हर्च्यूअल रिअलिटी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी मांडली.

ही संकल्पना म्हणजे एक गुंतवूण ठेवणारा अनुभव ठरेल, ज्यामध्ये नागरिकांना व्हर्चुअल रिअलिटी तंत्रज्ञानाद्वारे सांगण्यात येणाऱ्या गोष्टीमधून वर्तमान, भूत आणि भविष्य काळातील सांस्कृतिक पार्श्वभूमी जाणून घेता येणार आहे. पारंपारिक ग्रंथालयाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ग्रंथालयात रूपांतर करत, माहितीची प्रभावी देवाणघेवाण करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

निशुल्क नाव नोंदणीसाठी कृपया या लिंकचा वापर करावा – https://www.ticketkhidakee.com/infinitelibraries