ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करत भर सभेत शिव्यांची लाखोली

मुंबई- शिवसेनेशी बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर ठाकरे गटाकडून सातत्याने टीका होत आहे. पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरलं, गद्दारी केली अशा शब्दांत सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अवहेलना केली जात आहे. मात्र ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकारीने त्यांचा थेट एकेरी उल्लेख करत शिवीगाळ केली आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘सकाळ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ठाकरे गटाच्या पदाधिकारी मुंबईच्या विभाग संघटक राजुल पटेल असं या महिलेचे नाव असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना व्यासपीठावरून शिव्यांची लाखोली केली. तर त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष करत घोषणाबाजी केली आहे. कल्याण येथे आयोजित ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्यांचा हा अपशब्द वापरलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.