अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला गावातील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी 14 एप्रिल रोजी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाईपने झालेल्या बेदम मारहाणीमुळे त्यांच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून, अंगात रक्तसाकळल्याची माहिती समोर आली आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
बीडच्या सनगावमध्ये ध्वनी प्रदूषणा विरोधात तक्रार करणाऱ्या वकील महिलेला सरपंच व इतरांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समाज माध्यमातून समोर आली आहे. पीडित महिलेने न्यायालयात केलेली खुनाच्या प्रयत्नाची केस काढून घ्यावी असा दबाव ही टाकण्यात आला. सदर प्रकरणी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात सरपंच व इतर ९ आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. राज्य महिला आयोगाने तातडीने आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाद्वारे सोशल मीडियावर देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास अपर पोलिस अधीक्षक अंबाजोगाई, सहा. पोलिस अधीक्षक, केज यांचे मार्गदर्शनाखाली एपीआयमच्छिंद्रनाथ शेंडगे करत आहेत.