हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटी सेना; तुषार भोसलेंची घणाघाती टीका

 मुंबई – तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी देखील त्यांच्यासोबत आहेत. आज 1 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्या भेटणार होत्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट झाली नाही. म्हणून राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, या भेटीवर आता भाजपने टीका केली आहे. भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या भेटीवरून शरसंधान केले आहे. ते म्हणाले, ‘जय श्रीराम’ चा नारा ऐकला की डोक्यात तिडीक उठणाऱ्यांपुढे हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण. हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटी सेना. अशी टीका भोसले यांनी केली आहे.