‘राष्ट्रवादीने अजितदादांचा दिल्लीत बोलावून  मोठा अपमान केला’ 

मुंबई –    राष्ट्रवादीचं  8 वे राष्ट्रीय अधिवेशन (NCP National Convention) राजधानी दिल्ली इथं पार पडलं. पण हे अधिवेशन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीनाट्यामुळे गाजलं. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सर्व बड्या नेत्यांनी भाषण केलं. मात्र, अजित पवार यांनी भाषण केलं नाही. अजित पवार यांनी भाषण न केल्याने आता वेगळी चर्चा सुरू आली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील (Ajit Pawar vs Jayant Patil) यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा दिसून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पाकातील सर्व मोठ्या नेत्यांची भाषणे झाली. मात्र यात अजित पवार यांचा समावेश नव्हता. या अधिवेशनात शरद पवार यांच्या भाषण आधी जयंत पाटील भाषण करतील अशी घोषणा झाली. त्यावेळी अजित पवार यांना बोलायला द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या. कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरु असताना अजित पवार तिथून निघून गेले.

जयंत पाटील यांचे भाषण झाल्यानंतर अजित पवार यांचे नाव पुकारण्यात आले. मात्र त्यावेळी अजित पवार हे सभागृहात उपस्थित नव्हते. अजित पवार सभागृहात नसल्याने त्यांना घेऊन जाण्यासाठी सुप्रिया सुळे बाहेर गेल्या. त्या अजित पवार यांना सभागृहात परत घेऊन आल्या. मात्र तोपर्यंत शरद पवार यांचे समारोपाच्या भाषणाला सुरुवात झाली होती. यामुळे त्यांना या कार्यक्रमात भाषण करता आलं नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीने अजितदादांचा दिल्लीत बोलावून  मोठा अपमान केला असा आरोप आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे. ते म्हणाले, देहूतल्या कार्यक्रमात  पंतप्रधानांनी आग्रह करुनही अजितदादांनी भाषण केलं नाही तरी राष्ट्रवादीने आकांडतांडव केलं होतं आणि आता तर अजितदादांना राष्ट्रवादीच्याच राष्ट्रीय अधिवेशनात बोलू दिलं नाही. सुप्रिया सुळे जी, आधी स्वतःच्या पक्षात तर त्यांचा मान सन्मान ठेवा !असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.