‘आम्ही ज्यांच्यासोबत सत्तेत होतो त्यांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हंटल याची आम्हाला लाज वाटते’

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेश मध्ये झंझावाती प्रचार दौरा सुरु केला आहे. उत्तर प्रदेशात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या दोन प्रचारसभा आहेत. त्यातील एका सभेत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र, उत्तरप्रदेश भाजपच्या नेत्यावर जोरदार तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी राज्यात निघालेल्या शेतकरी मोर्चावर भाष्य करत त्यावेळी आम्ही भाजप सोबत होतो याची लाज वाटत असल्याचे म्हंटल आहे.

उत्तर प्रदेशातील सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं होतं. शेतकरी बंधू-भगिनी मुंबईकडे येऊ लागले. एक विशाल मोर्चा येऊ लागला. तेव्हाच्या सरकारमध्ये शिवसेनादेखील होती. त्यावेळी आमच्याकडून खूप चुका झाल्या. पण आता आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना काय काय म्हणलं गेलं. त्यांचा झेंडा लाल होता. त्यांचं रक्त लाल होतं. त्यांना माओवादी, नक्षलवादी, दहशतवादी म्हटलं गेलं. पण ते शेतकरी होते, आपल्या हक्कांसाठी लढत होते. त्याच गोष्टी इथे घडल्या. लखीमपूरची घटना कुणी विसरलंय का? या गोष्टींमुळे खूप जखमा झाल्या आहेत, हीच स्थिती बदलण्याची गरज आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं.

दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा शिवसेनेनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर विस्ताराचा अजेंडा अधिक प्रभावीपणे राबवला जात आहे. गोव्यात शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. तर उत्तर प्रदेशात 400 जागांपैकी 51 जागांवर शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना राज्याबाहेर ताकद आजमावून पहात आहे.