अब्दुल सत्तार यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली 

मुंबई –  गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप -प्रत्यारोप होत असताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार गद्दार असून, त्यांच्यात दम असेल त्यांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवावे असं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता  आदित्य ठाकरे यांचे हे आव्हान आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वीकारले आहे. आमदारकीचा राजीनामा देण्याची परवानगी मी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली असून, त्यांनतर निवडणूक लढवून जिंकून दाखवतो असे म्हणत सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचे चॅलेंज स्वीकारले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रीया देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, मला राजीनामा देण्याची परवानगी द्या अशी विनंती मुख्यमंत्री यांना मी केली आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा माहित पडेल आणि मला माझी जागा माहित पडेल. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी मला परवानगी दिली तर उद्या मी राजीनामा देणार आहे. पहिली निवडणूक लढवून त्यांना दाखवणार की, किती मतांनी निवडून येतो असे म्हणत सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचे चॅलेंज स्वीकारले. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तार यांना परवानगी देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.