आजारपणामुळे पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, मग पालिकेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित कसे?

मुंबई – आधी कोरोनामुळे आणि नंतर आजारपणामुळे गेले अनेक दिवस झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. याचाच फायदा घेत अनेक ठिकाणी भ्रष्ट कारभार वाढत असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. विरोधक देखील या मुद्यावरून वारंवार सरकारला डिवचत असतात.

भाजपला सत्तेवर येवू न देण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले मात्र या तिन्ही पक्षात समन्वय नसल्याचे वारंवार समोर आले आहे. याचाच फायदा प्रशासनातील काही अधिकारी घेत असल्याने जनतेला वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता कोरोनास्थितीचा आढावा घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी निमंत्रित केलेल्या महत्वपूर्ण दूरसंवाद बैठकीसही ते प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. सलग अडीच तास बसणेदेखील त्यांना शक्य नाही अशी कबुली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच दिली आहे. ठाकरे यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधानांच्या बैठकीला हजेरी लावली.

दरम्यान,काल मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ या सुविधेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. याच मुद्द्यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवाल केलाय.

मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नाही हे आम्ही समजू शकतो. देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात त्यावेळी केंद्राशी काही तरी मागणी अपेक्षित होती. मात्र, पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहतात आणि एका अॅपच्या उद्घाटनासाठी उपस्थितीत राहतात. मग 10 ते 12 तासात अशी काय जादूची कांडी फिरली की त्यांची प्रकृती ठणठणीत होते आणि ते महापालिकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले ? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.