शिक्षणाचा हक्क काढून घेणाऱ्या प्रशासनाला अभाविपचा दणका

पुणे – पी.व्ही.पी.आय.टी. महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांना शुल्क न भरल्या कारणामुळे परिक्षेला बसू दिले नाही. विद्यार्थ्यांनी शुल्क भरण्यासाठी मुदत मागीतली, वेळोवेळी विचारणा करून देखील नीट उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे समजले नाही. अखेर शुल्क भरल्यावर विद्यार्थी परिक्षा संदर्भात प्रश्न विचारायला महाविद्यालयात गेले असता तुमचे नुकसान होणार नाही म्हणत खोटी आश्वासने दिली. अखेरीस, महाविद्यालयाचा निकाल लागल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या निकालपत्रकावर नापास चा शिक्का पडला.

शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतीत सवलत द्यावी, त्यांना परिक्षेला बसविण्यापासून अडवू नये, असा नियम असून देखील विद्यार्थ्यांसोबत पी.व्ही.पी.आय.टी. महाविद्यालयाच्या (P.V.P.I.T. College) प्रशासनाने अन्याय केला. या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी अभाविप कोथरूड भागाचे शिष्ट मंडळ निवेदन देण्यास गेले असता ते घेण्यास नकार देण्यात आला. आठवड्याभराची मुदत देऊन देखील प्रश्न न सुटल्याने आज दिनांक ३० ऑगस्ट २०२२ ला अभाविप ने महाविद्यालयाच्या गेट वर आंदोलन (ABVP Protest) केले.

शासन व विद्यापीठाचे या विषयातील परिपत्रक असताना देखील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याच काम पी.व्ही.पी.आय.टी. महाविद्यालय प्रशासन करत आहे. ज्या ठिकाणी कायद्याची पायमल्ली आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होईल त्या ठिकाणी अभाविप (ABVP) विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरेल, असे वक्तव्य या वेळी अभाविप पुणे महानगराचे महानगर मंत्री शुभंकर बाचल (Shubhankar Bachal) यांनी केले. अखेर, महाविद्यालय प्रशासन आणि अभाविप मध्ये चर्चा झाली, व त्यातून विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणावर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी महाविद्यालय प्रशासन जबाबदारीने निर्णय घेईल असे वक्तव्य पोलीस प्रशासनाच्या साक्षीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले. असं अभाविपने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.