ठाकरे गटाच्या आमदाराला ACBची नोटीस; अडचणी वाढण्याची शक्यता 

बाळापूर  – गेल्या वर्षी जूनमध्ये “बंडखोरी” करणाऱ्या आणि नंतर गुवाहाटीमध्ये आपला निर्णय बदललेल्या एका आमदाराला लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) ची नोटीस बजावल्यानंतर शिवसेना-UBT वर दबाव आणखी वाढला, असे पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी येथे सांगितले. अवैध मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारी रोजी त्यांना अमरावतीच्या कार्यालयात बोलविण्यात आलं आहे. बाळापूर (अकोला)चे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस बजावली असून, बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून अशा नोटिसा पाठवणारे ते गेल्या दोन महिन्यांतील तिसरे आमदार आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत, कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील वैभव नाईक आणि राजापूर (रत्नागिरी) येथील राजन साळवी या दोन आमदारांना अनुक्रमे ऑक्टोबर आणि डिसेंबर 2022 मध्ये ACB नोटिसा मिळाल्या होत्या.

याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, तक्रार कुणाची आहे, तक्रारदाराचं नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नोटीशीत दिलेलं नाही. आमदाराला नोटीस देताना तक्रारदाराचं साधं नाव देखील दिलेले नाही. १७ तारखेला अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन मीडियाला याबाबत माझी भूमिका स्पष्ट करेल. भास्कर जाधव अधिवेशनात बोलले, लगेच त्यांना नोटीस आली. मलाही आता नोटीस आली आहे. ईडीची नोटीस आली तरी मी घाबरणार नाही. माझ्याकडे चुकीची मालमत्ता नाही.