माजी आरोग्य मंत्र्याच्या गाडीला डंपरने धडक दिल्याने अपघात, डॉ. दीपक सावंत जखमी

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांच्या अपघाताची मालिका सुरू आहे. गेल्या महिनाभरात धनंजय मुंडे, बच्चू कडू, योगेश कदम या नेत्यांचा अपघात झाला आहे. यानंतर आता राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांचा आज सकाळी काशीमीरा येथे अपघात (Deepak Sawant Accident) झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दीपक सावंत हे आज सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना मार लागला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

डॉ. दीपक सावंत हे सकाळी पालघरच्या दिशेने जात असताना महामार्गावर काशिमीरा येथे त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक दिली. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून त्यांना पोलिसांनी मुंबईत उपचारासाठी अँम्ब्युलन्सने पाठवले आहे.