पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा

पुणे  : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे असून या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.    (Account opening facility through India Post Payment Bank for beneficiaries of PM Kisan Yojana).

केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या १३ व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून त्यासाठी लाभार्थीनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

राज्यात सद्यस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थींनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांच्या आधारे इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल.

ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थ्यांना  संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील.

या योजनेच्या लाभासाठी खाती उघडण्याची मोहीम आयपीपीबी मार्फत १ ते १२ फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहानही करण्यात आले आहे