अमोल मिटकरींनी दिली शरद पवारांना विठ्ठलाची उपमा; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोलापूर येथील एका मेळाव्यात बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांची तुलना थेट विठ्ठल देवाशी केली. संत चोखोबांचा अभंग गात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना श्रीविठ्ठलाची उपमा दिली. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपा नेते आचार्य तुषार भोसले (Acharya Bhosale) यांनी अमोल मिटकरींच्या या विधानाचा निषेध केला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते देवी-देवता, महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसत आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहेत. अशातच अमोल मिटकरी यांनी सोलापूर येथील मेळाव्यात भाषण करताना “आमचा विठ्ठल आहेत शरद पवार”, असे म्हटले. यावर शरद पवारांना विठ्ठल देवाची उपमा देणे म्हणजे आमच्या आराध्य दैवताचा अपमान होय, असे म्हणत आचार्य भोसले यांनी अमोल मिटकरींच्या विधानाची टीका केली आहे.

‘हा महामूर्ख नेहमीच गरळ ओकतो! आता तर संत चोखोबांच्या अभंगाची मोडतोड करतोय आणि अजून शरद पवारांना श्रीविठ्ठलाची उपमा देऊन आमच्या आराध्य दैवताचा अपमान करतोय!’, अशी प्रतिक्रिया आचार्य भोसले यांनी ट्वीटमधून दिली आहे. तसेच अजित पवार यांना कटू सल्लाही त्यांनी दिला आहे. ‘अजितदादा, तुमच्या या लाडक्या ‘वाचाळवीरा’ला आधी आवरा आणि मग इतरांना ब्रह्मज्ञान सांगा!’, असे आचार्य भोसले यांनी अजित पवारांना सुनावले आहे.