“आपल्या समाजात पुरुष शर्टशिवाय बाहेर फिरू शकतात, पण महिला..”, महिला हक्क कार्यकर्त्या रेहाना यांची प्रतिक्रिया

सेमी न्यूड बॉडी पेंटिंग प्रकरणी (Semi Nude Body Painting Case) केरळ उच्च न्यायालयाने महिला हक्का कार्यकर्त्या रेहाना फातिमाची (Activist Rehana Fatima) सोमवारी (०५ जून) निर्दोष मुक्तता केली आहे. फातिमाने स्त्री आणि पुरुषाच्या शरीराकडे बघण्याच्या समाजातील दुटप्पीपणाला आव्हान दिलं. तसेच स्त्री-पुरुष शरीराकडे समान दृष्टीकोनातून बघावं, यासाठी स्वतःच्या अर्धनग्न शरीरावर आपल्याच मुलांना चित्र काढायला लावलं.

निकाल देताना केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ म्हणाले, ‘नग्नतेला अश्लीलता किंवा अनैतिकता असे विभागणे चुकीचे आहे. नग्नतेचा संबंध लैंगिकतेशी जोडू नये. स्त्रीच्या शरीराचा फक्त वरचा भाग नग्न असणे, लैंगिकता नाही. त्याचप्रमाणे, स्त्रीच्या नग्न शरीराचे वर्णन किंवा चित्रण देखील नेहमीच लैंगिक किंवा अश्लील नसते.”

रेहानाने तिचा अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा बॉडी पेंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यामुळे तिच्याविरुद्ध केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोग POCSO कायद्यांतर्गत 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर रेहाना फातिमा म्हणाल्या की, हा लढा तिच्यापेक्षा तिच्या मुलांसाठी जास्त कठीण होता.

“तीन वर्षांनंतर हे सिद्ध झाले आहे की, मी जे केले ते चुकीचे नव्हते, मी जो काही संदेश दिला तो चुकीचा नव्हता. आपल्या समाजात पुरुष शर्टशिवाय बाहेर फिरू शकतात, परंतु प्रत्येक समाजातील महिलांसाठी एक प्रथा आहे. आपली विचारसरणी बदलायला हवी,” असे रेहाना म्हणाल्या.