घरोघरी जाऊन मोदीजींचे विकासकार्य जनतेपर्यंत पोहचवा ;देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा शुभारंभ

Dvendra Fadnavis : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गत नऊ वर्षांचा कार्यकाळ हा विकासपर्वचा काळ राहिला आहे. त्यामुळे माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी केले. तसेच कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला.

भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस आणि पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार फडणवीस बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे,राहुल कुल, सिद्धर्थ शिरोळे,भीमराव तापकीर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, बापू पठारे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी,राजेश पांडे, चिटणीस वर्षा डहाळे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक गतीने विकास केला. कोरोना काळानंतर अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत. पण आपला देश विकासाच्या वाटेवर आजही मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे विकसित देश देखील आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आज माननीय मोदीजींचे नेतृत्व जगमान्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील माननीय मोदीजींशी बोलण्यासाठी आतूर असतात. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, आज कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत. बेगामी शादी में अब्दुल दिवाना अशी स्थिती आहे. आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल. वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचे मूल्यमापन नेहमीच होत असते. कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून काम करत होता. त्यामुळे जगदीश मुळीक यांनी असेच आपले कार्य सातत्याने सुरू ठेवावे अशी सूचना केली. तसेच घर चलो संपर्क अभियानाद्वारे कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.‌तर स्वागत गणेश घोष यांनी केले.