५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास पूर्ण केल्यावर अशोकमामांना वाटतेय ‘या’ गोष्टीची खंत

पुणे : शोधकवृत्ती ठेवली तर आयुष्यात बरेच काही मिळते. मी वेळोवेळी सगळ्यांकडून शिकत राहिलो आणि समृद्ध होत गेलो, असे मत आज ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये काल भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अशोक सराफ यांना ‘पिफ डिस्टिंग्विश अवार्ड’ देत गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने आज पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते.

सराफ म्हणाले की, कोणी गुरु नसला तरी अनेकांकडून अनेक गोष्टी मी शिकत गेलो. ते म्हणाले “मी मूळचा बेळगावचा पण वाढलो मुंबईमध्ये. मामांची नाटक कंपनी होती. त्यातून ही अभिनयाची कला पुढे आली. मामा रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. चार्ली चॅप्लिन यांच्याकडून विनोदातील कारुण्य समजले. लॉरेल-हार्डी यांचा स्लॅपस्टीक विनोद भावला. राजा गोसावी यांची शब्दफेक आवडली. त्यातून पुढे गेलो. आयुष्यात शोधकवृत्ती ठेवली तर बरेच काही मिळवता येते. मी आजही गोष्टी स्वत: करून बघतो. तेच माझ्या थोडया फार यशाचे रहस्य आहे.”

सुमारे २ तास चाललेल्या गप्पांमध्ये आज अशोक सराफ यांच्या ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास उलगडत गेला. तब्बल २५० मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिका अशी मोठी कारकीर्द असलेल्या सराफ यांना जब्बार पटेल यांनी बोलते केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही सराफ यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली अन गप्पांची ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

आपले संवाद हे तालावर आधारित असतात. वयाच्या ५ व्या वर्षीपासून तबला वाजवत असल्याने ताल संवादात आला, प्रेक्षकांनाही तो आवडला असे सांगत सराफ म्हणाले, “ संशय कल्लोळ या नाटकामध्ये आणि ‘कळत नकळत’ या चित्रपटामध्ये मी गाणी म्हटली आहेत. मी सुरांच्या जवळपास आहे, मात्र सुरात नाही. म्हणून पुढे गाण्याचे धाडस केले नाही.”

सराफ पुढे म्हणाले, “हमीदाबाईची कोठी हे नाटक करताना विजयाबाई मेहता यांनी संधी दिली. त्यामुळे आयुष्यातील मोठी आणि वेगळी भूमिका करायला मिळाली. विजयाबाईंनी एक आत्मविश्वास दिला. अभिनय कसा करायचा हे त्या कधीही दाखवीत नसत उलट तुमच्यामधील अभिनय कौशल्याने त्या काढून घेत हेच त्यांचे वैशिष्ट्य होते.”

विनोदी भूमिकेमध्येच अडकून पडलात का, असे विचारले असता सराफ म्हणाले, “विनोदी कलाकार अशी माझी एक इमेज झाली आणि याची मला खंत आहे. अर्थात लोकांनाही माझ्या याच भूमिका आवडल्या त्यामुळे कलाकार म्हणून लोकांना जे हवयं ते देत आलो. लोकांनी प्रेम खूप केले पण त्यांना ‘एक उनाड दिवस’मधल्या भूमिकांसारख्या वेगळ्या भूमिका आवडल्या नाहीत. लोकांना शाब्दिक विनोद आवडला पण परिस्थितीनुसार होणारा विनोद आवडला नाही.”

१९७१ साली ‘दोन्ही घरचा पाहुणा’मधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केलेल्या सराफ यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर ४५ चित्रपटांत काम केले आहे. त्याबद्दल बोलताना सराफ म्हणाले, “तो एकाच प्रकारचा विनोद होता, कारण आम्हाला वेगळे लिहिणारे लेखक मिळाले नाहीत. पण आम्ही लोकांना चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघायची सवय लावली. मी माझ्या दृष्टीने विनोद करतो, पण तो प्रेक्षकांना कसा वाटतो, हे महत्त्वाचे आहे.”, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी जॉनी लिव्हर, दादा कोंडके, निळू फुले यांच्या अनेक आठवणी सराफ यांनी सांगितल्या. ‘हम पांच मालिकेची आठवण सांगताना सराफ म्हणाले, की आता फक्त मालिकेचे भाग तयार होतात, पण ते शारीरिकदृष्ट्या परवडणारे नाहीत.

पुल देशपांडे यांचे साहित्य आणि १९५०-६० च्या दशकातील लता मंगेशकर यांची गाणी आपल्याला ताजेतवाणे करत असल्याचेही सराफ यांनी सांगितले. या वेळी पटेल म्हणाले, “अशोक सराफ म्हणजे चैतन्य. मराठी सिनेमाचा इतिहास आहे. अतिशय शिस्तशीर असणारा हा अभिनेता म्हणजे बुद्धीमत्ता आणि कल्पकता यांचा मिलाफ आहे. नटाकडे एक माणूसपण असावे लागते, ते अशोक सराफ यांच्याकडे आहे.

हे देखील पहा