सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ; लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून धोका असल्याची चर्चा

मुंबई – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Panjab Singer Suddhu Musewala) याची गोळ्या घालून हत्या (murder) करण्यात आली. सिद्धूच्या हत्येमुळे संपूर्ण पंजाब हादरले आहे. या हत्येप्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येच्या प्राथमिक तपासात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे (lorence Bishnoi) नाव समोर आल्यानंतर आता  बॉलीवूड अभिनेते सलमान खान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गायक मुसेवाला हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचं मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१८ मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगातूनच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचं कारण होतं सलमान खानचं काळविट शिकार प्रकरण. सलमान खानला काळविट शिकार प्रकरणावरुन थेट जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली होती. इतकेच नव्हे तर लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येच प्लानिंग सुद्धा केलं होतं.

“आम्ही सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. कोणत्याही टोळी किंवा गुंडांकडून कोणतीही वाईट कृत्ये होणार नाहीत याची खात्री घेत आहोत. सलमानच्या अपार्टमेंटभोवती पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे”, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.