अभिनेता सुमीत राघवनचे वादग्रस्त ट्वीट, आरे आंदोलकांना म्हणाला बोगस आणि फालतू

मुंबई: गोरेगाव येथील आरे कारशेडवरून मुंबई मेट्रो-३ प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे. पर्यावरण प्रेमींच्या अडथळ्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने कारशेड तिथेच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो प्रकल्पाला अभिनेता सुमीत राघवन याचा पाठींबा आहे. त्याने नुकतंच कारशेड विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमींची खिल्ली उडवणारे ट्वीट केले आहे.

सुमीत राघवननं (Sumeet Raghvan) एक ट्वीट रिट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये एक व्हिडिओ जोडलेला असून या व्हिडिओत फ्रेंचमधील नागरिक वातावरण बदलाबाबत भर रस्त्यात आंदोलन करणाऱ्यांना बाजूला हटवत असल्याचे दिसत आहे. या ट्वीटला रिट्वीट करत सुमीत राघवनने कारशेड विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमींनाही अशीच वागणूक मिळावी, असे म्हटले आहे. यामुळे सुमीत राघवनला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.’

सुमीत राघवनने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘आरे आंदोलकांविरुद्ध आपणही असेच करायला पाहिजे होते. डोक्यावर बसले होते हे बोगस, फालतू लोक. ना कोणत्या कामाचे ना धामाचे.’ सुमीत राघवनच्या या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.