‘दे दणादण’ चित्रपटातील ‘आवडाक्का’ काळाच्या पडद्याआड, अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

मुंबई – ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन झालं आहे.(Veteran Marathi actress Prema Kiran passes away)  ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘हे तर काहीच नाय’ (He Tar Kahich Nay) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी दे देणादण चित्रपटातील गंमतीशीर किस्से सांगितले होते.