सुभाष घई यांच्या ‘विजेता’ आणि ’36 फार्महाऊस’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री प्रीतम कागणे

मुंबई : अभिनेत्री प्रीतम कागणेच्या अभिनयाची वाटचाल ही दाक्षिणात्य चित्रपटातून झाल्याचे समोर आले आहे. ‘मिस्टर बिन’ या मल्याळम चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून दाक्षिणात्य सिनेरसिकांच्या मनात तिने एक वेगळेच स्थान निर्माण केले. त्यानंतर हळूहळू तिने मराठी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळविला. ‘नवरा माझा भोवरा’, ‘हलाल’, ‘अहिल्या’,’वाजवूया बँड बाजा’ यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रीतमने मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावले. इतकेच नव्हे तर याशिवाय सोहा अली खानसोबतच्या ’31 ऑक्टोबर’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. मराठी, मल्याळम, हिंदी या तिन्ही भाषिक चित्रपटसृष्टीत तिने अभिनयाची बाजू घट्ट रोवली. बेस्ट डेब्यु म्हणून ‘संस्कृती कालादर्पण अवॉर्ड’, बेस्ट प्रॉमिसिंग ऐक्ट्रेस म्हणून ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’, बेस्ट ऐक्ट्रेस म्हणून ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड’ आणि ‘सह्याद्री सिने अवॉर्ड’ पटकावत अभिनय क्षेत्रात कौतुकाची थाप देखील मिळवली.

प्रीतम आता ‘विजेता’ चित्रपटाचे सहनिर्माते सुभाष घई यांच्या ‘विजेता’ या मराठी मल्टीस्टारर चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तसेच ती सुभाष घई यांच्या ’36 फार्महाऊस’ या हिंदी चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटसृष्टीत सुभाष घई यांनी बरेच नाव कमावले आहे, शिवाय गाजलेले चित्रपट दिले आहेत, त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. शिवाय सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या ‘बळी’ चित्रपटातही प्रीतम भूमिका साकारताना दिसणार आहे.

तिच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल बोलताना ती असे म्हणाली की, अभिनय ही माझी आवड आहे, आणि आवड म्हणून मी ही कला जोपासत आहे. मी मराठी, मल्याळम, हिंदी या तीनही चित्रपटसृष्टीत अभिनय केला असून या तीन वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीत काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. प्रत्येक भाषेत अभिनय करताना मला नव्याने बरेच काही शिकायला मिळाले. चित्रपसृष्टीत काम करताना बऱ्याच दिग्गज कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. सुभाष घई यांच्या दोन चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे स्वप्न पूर्ण झाल्यागतच आहे. सुभाष सरांकडून सेटवर वावरताना म्हणा वा भेटल्यावर खूप काही शिकायला मिळाले. आणि मुख्य म्हणजे माझा प्रेक्षकवर्ग. आजवर मला मिळालेली प्रेक्षकांची साथ ही अमूल्य असून माझ्या इथवरच्या प्रवासात त्यांचा खारीचा वाटा आहे.

हे देखील पहा