पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही – आदित्य ठाकरे

Mumbai – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. (Rahul Narvekar finally becomes the Speaker of the Maharashtra Legislative Assembly) विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली.
ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.

दरम्यान, आज बोलताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. ते म्हणाले, बंडखोर आमदारांनी व्हीप मोडलेला आहे आणि उपाध्यक्षांकडे याचा विरोध केला आहे. एकाही पळालेल्या आमदाराने डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही. सगळे डोळे चोरून खाली किंवा दुसरीकडे बघत होते. आज त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही पण मतदारांकडे गेल्यानंतर काय सांगणार?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

दरम्यान, भाजपाने शिवसेनेमधील बंडखोर गटाला समर्थन देत बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांपूर्वी युतीमध्ये मतभेद निर्माण होण्याआधीच हे केलं असतं तर अधिक चांगलं झालं असं म्हणत खंत व्यक्त केली होती. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही अडीच वर्षांपूर्वी याच मुद्द्यावरुन शिवसेना भाजपामध्ये मतभेद झाल्याचं म्हटले.