‘आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून निवडून येऊन दाखवावं’

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडली असून दोन्ही बाजूंनी टीका होताना सातत्याने पाहायला मिळत आहे. यातच आता माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटावर आणि आमदार आदित्य ठाकरेंवर शरसंधान केले आहे.  खंजीर खुपसणं या शब्दाची व्याख्या आदित्य ठाकरे यांनी समजून घ्यावी. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून पुन्हा निवडून येऊन दाखवावं, अशा शब्दांत  शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) आव्हान दिलं आहे.

त्या म्हणाल्या, आदित्यजी, आपण आमदार झालात तेव्हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो लावून मते मागितली होती. त्यामुळे आपल्या आमदार होण्यामागे भाजपचीही (BJP) मते आहेत. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तुम्हीच द्या आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांचा फोटो लावून निवडून येऊन दाखवा. शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

गेल्या अनेक दिवसांपासून पाठीत खंजीर खुपसणं, गद्दारी, विश्वासघात हे शब्द आम्ही आपल्या तोंडून ऐकत आहोत. खरंतर या शब्दांची व्याख्या समजून घेतली तर बरं होईल. आपण महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत आला आहात. त्यामुळे मतदारांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला असेल तर तो आपण खुपसलाय. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन रामराज्य (Ram Rajya) आणायचा प्रयत्न करत आहोत, असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलं.