शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो; आदित्य ठाकरेंची डरकाळी

पणजी: महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनं यंदा गोव्यामध्ये ११ जागी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा निवडणुकांसाठी सध्या आदित्य ठाकरे प्रचार करण्यासाठी गोव्यात असून त्यांनी देखील भाजपावर टीका केली आहे. आज पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला केला आहे.

भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नव्हे तर एनडीएतील (NDA) मित्रपक्षांच्या पाठितही खंजीर खुपसला आहे. त्यामुळेच एक एक करून सर्व पक्ष भाजपला सोडून गेले, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. आम्ही कोणत्याही घोडेबाजारावर विश्वास ठेवत नाही. शिवसेनेचे वाघ असतात. वाघांचा बाजार नसतो, असं आदित्य यांनी सांगितलं.

ठाकरे म्हणाले, आम्ही शिवसेनेचं किंवा कोणत्याही पक्षाचं भवितव्य ठरवण्यासाठी आलो नाही. तर आम्ही केवळ गोव्यातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढायला आलो आहोत. मागच्या काळात भाजपसोबत युती होती. मित्रता असेल तर मैत्री स्वच्छ असली पाहिजे, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भावना होती. मित्राला धोका होऊ नये. हिंदू मतात फूट पडू नये आणि आपल्यामुळे मित्राला अडथळा येऊ नये म्हणून आम्ही इतर राज्यात लढत नव्हतो. त्या काळात इतर पक्ष वाढत गेले.

आमच्यातील काही शिवसैनिक त्यांच्या पक्षात गेले. खासदार आणि मंत्री झाले. तरीही आम्ही मैत्री जपायची म्हणून कुठेही लढलो नव्हतो. पण, गेल्या पाच वर्षात आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आमच्याच नाही जे काही एनडीएचे मित्र पक्ष होते ते सर्व सोडून गेले. त्यामुळे ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व होतं तिथं आम्ही लढायला सुरुवात केली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.