आदित्य ठाकरे यांची एन्ट्री आणि नितेश राणेंच्या ‘म्याव-म्याव’च्या घोषणा!

मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि आज ठाकरे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती तयार आहे. नोकरभरती, वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षेत झालेले घोळ यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती असणार आहे. काल भाजप आमदारांची आयोजित केलेल्या भोजनावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केल्याचं कळतंय.

दरम्यान परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे गेल्या सरकारशी जोडले गेले आहेत हे पुराव्यानिशी सादर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळं आज परीक्षा घोटाळ्यांवरुन सरकारची परीक्षा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

आज सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात वाढीव वीजबिल, परीक्षा घोटाळा यांसारख्या अनेक प्रश्नांवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळीच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनाच्या आवारात दाखल झाले. आंदोलन करत असणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना पाहताच ‘म्याव-म्याव’च्या घोषणा देण्यास सुरवात केली. या घोषणेची जोरदार चर्चा विधानभवन आवारात सुरु होती.

दरम्यान, आज सभागृहाचे कामकाज सुरु होताच परिवहन मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. हे दोन्ही नेते सभागृहातच हमरीतुमरीवर आल्याच पाहायला मिळालं. अनिल परब हे एका प्रश्नांचे उत्तर देत असताना नितेश राणे मध्ये बोलल्याने संतापलेल्या अनिल परबांनी आक्षेप घेत ‘याला आधी जागेवर बसायला सांगा हा याचा नंबर आहे, याला आसन व्यवस्था दाखवा’ असं खडसावले. त्यानंतर अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतरच याला प्रश्न विचारला सांगा अस अनिल परब म्हणाले.

त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आसन क्रमांक आम्ही देतो तुम्ही सीट्स अलोट करतात, त्यामुळे कोणाला कुठ बसवायचं हा आमचा कॉल आहे. असं सांगितल्यानंतर या वादावर पडदा पडला. त्यामुळे आज सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्यात आज जोरदार खडाजंगी उडणार हे नक्की आहे.