आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ५०० कोटींच्या भूखंडाची चौकशी होणार

Mumbai – केंद्रातील मोदी सरकारच्या रडारवर आमदार आदित्य ठाकरे आले आहेत. ५०० कोटींच्या एका भूखंडासंदर्भात चौकशीचे आदेत केंद्रीय पर्यावरण विभागाने दिल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना नवी मुंबईमध्ये एका देवस्थानाला देण्यात आलेल्या दहा एकर भूखंडाची चौकशी केली जाणार आहे.

दक्षिण नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये दहा एकर भूखंड आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमल्ला देवस्थानाच्या प्रति तिरुपती बालाजी मंदिरासाठी देण्यात आला असून याच निर्णयाची आता चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत या दहा एकर भूखंडाची किंमत ५०० कोटी रुपये इतकी आहे. सीआरझेड वन प्रकारातील हा भूखंड देवस्थानाला देऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर ही चौकशी केली जाणार आहे.

मार्च २०२२ मध्ये सिडकोने उलवे सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक तीनच्या वाढीव एक चटई निर्देशांकाने ४० हजार ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड केवळ एक रुपया नाममात्र दराने तिरुपती देवस्थानाला देण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण विभागाच्या माध्यमातून हा भूखंड मिळवून देण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची महत्त्वाची भूमिका बजावली. नार्वेकर हे तिरुपती बालाजी देवस्थानाच्या समितीवर विश्वस्त आहेत. हा भूखंड देवस्थानच्या ताब्यात देण्यासंदर्भातील पत्र आदित्य ठाकरेंनीच ३० मार्च रोजी ट्विटरवरुन शेअर केले होते. यासंदर्भात टीव्ही९ने वृत्त दिले आहे.