ममता बॅनर्जींची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तीन दिवसीय दौऱ्यासाठी आज मुंबईत दाखल झालेल्या आहेत. या दौऱ्याची सध्या बरच चर्चा होताना दिसून येत आहे. या दौऱ्यात त्या अनेक महत्वपूर्ण भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील त्या उद्या भेटणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्या भेटणार होत्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नाही. म्हणून आज राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. या अगोदर दोन-तीन वर्षांपूर्वी देखील जेव्हा त्या आल्या होत्या, तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे व मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आता मी संजय राऊत यांच्यासोबत आलेलो आहे. अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममतादीदी यांच्यात एक वेगळे नाते आहे. नेहमीच दोघांमध्ये समन्वय राहिलेला आहे.