आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवली; जाणून घ्या नेमकं काय आहे कारण ? 

Aditya Thackeray Security : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच ‘शिव संवाद’ यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून, यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार आहे.  ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात त्यांची सभा सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घातला होता. तर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ? 

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेदरम्यान काही ठिकाणी वादाचे आणि बाचाबाचीचे प्रसंग निर्माण झाले. सभास्थळाच्या बाजूने जाणाऱ्या एका रॅलीवररूनही वादाचा प्रसंग ओढवला. सभेनंतर आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या दिशेने काही दगड आले, असा गंभीर दावाही विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.