लखनऊमध्ये आदित्य ठाकरेंनी लावली होती ताकद, वाचा त्याठिकाणी सेनेच्या उमेदवाराला किती मतं मिळाली

लखनऊ : उत्तर प्रदेशसह भाजपचा वियजाचा वारू पुन्हा एकदा चौफेर उधळलाय. पाच राज्यापैकी चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी लखनऊमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात येतोय.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपला २६७ जागांवर विजय मिळाला आहे. तर दुरीकडे प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या काँग्रेसला अवघ्या २ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसची ही झालेली वाताहत काँग्रेसच्या नेतृत्वाला नक्कीच वेगळा विचार करायला लावणार आहे. तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी करत १३१ जागांवर बाजी मारली आहे.

दरम्यान, शिवसेनेनं सुद्धा उत्तर प्रदेशात आपलं नशीब आजमवलं होतं. परिवाराणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रचारसभा देखील घेतल्या होत्या. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. त्यामुळे ४१ ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला किती मतदान झालं? याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

लखनऊ मध्ये शिवसेनेनं आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार ताकद लावल्याचं बोललं जात होत. मात्र लखनऊ मध्यमधील शिवसेना उमेदवार गौरव वर्मा यांना अवघे 125 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे मेहरोत्रा हे विजयी झाले असून त्यांना 98605 मतं मिळाली आहेत. तर, भाजप नेते रजनीश कुमार गुप्ता हे 83,855 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत.