ॲड. ठाकूर यांच्या मागणीनंतर महिला व बालहक्क आयोगासह माविमच्या कार्यालयाचं स्थलांतर होणार

मुंबई – महिला आयोग, बालहक्क आयोग व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयांच्या दुरावस्थेचा मुद्दा माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही सर्व कार्यालये चांगल्या इमारतीत स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले.

ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत महिला व बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणा-या महिला आयोग, बालहक्क आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयांच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. सध्या ही तीनही कार्यालये एका इमारतीच्या पोटमाळ्यामध्ये आहेत. या कार्यालयांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे ही सर्व कार्यालये एका चांगल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी ॲड. ठाकूर यांनी केली. मागील बैठकीच्या इतिवृत्तांतामध्ये ही कार्यालये कुठे स्थलांतरित करायची याविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे, त्यानुसार ही कार्यालये स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी ॲड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ ताईंनी योग्य सूचना केली आहे. त्यामुळे चांगल्या जागी ही तीनही कार्यालये स्थलांतरित करून त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जातील”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मागणीनंतर दिले.